BY - युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर |
विद्यापीठांनी संधोशनाची व्याप्ती
काळानुसार वाढवली पाहिजे. स्थानिक समस्या,
प्रश्न यांच्यावर तोडगा काढणारे संशोधन करण्याबरोबरच स्थानिक उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करणारे अभ्यासक्रम विद्यापीठांनी
आखायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा
पंधरावा वर्धापन दिन समारंभ आज झाला. या कार्यक्रमाच्या
वेळी श्री. गडकरी बोलत होते. विद्यापीठाच्या
दीक्षांत सभामंडपात झालेल्या कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी,
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार संजय काका पाटील, कुलगुरु मृणालिनी
फडणवीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, 'काळ अतिशय गतीने बदलत आहे. या बदलाचा वेध घेणारे अभ्यासक्रम विद्यापीठाने आखायला
हवेत. स्थानिक उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ
निर्मिती होईल, असलेल्या मनुष्यबळाला आणखी प्रशिक्षण देता येईल या अनुषंगाने विद्यापीठांनी
अभ्यासक्रम आखायला हवेत. शिक्षणाचा प्रसार
झाला. गावा गावांत महाविद्यालये सुरु झाली. पण उच्च् शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढ झाली का याचा विद्यापीठाने
आढावा घ्यायला हवा. त्याअनुषंगाने प्रयत्न
करायला हवेत.’
विद्यापीठांनी काळानुरुप संशोधनाची व्याप्ती वाढवली
पाहिजे. त्याचबरोबर विद्यापीठ ज्या परिसरात आहे त्या परिसराच्या सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक
आणि औद्योगिक विकासात योगदान द्यायला हवे, असे मतही श्री. गडकरी यांनी व्यक्त केले.
कुलगुरु फडणवीस यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव
डॉ. व्ही. एस. घुटे यांनी आभार मानले. यावेळी
श्री. गडकरी यांच्या हस्ते शिलालेखाचे अभ्यासक आनंद कुंभार यांना जीवनगौरव पुरस्कार
देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी,
प्राध्यापकांचाही गौरव करण्यात आला.
Post a comment