BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा
भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभे करण्यात येणार असून त्या ठिकाणी स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल व अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य उपलब्ध
करून देण्यात येईल असे सांगून मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य
होते तेथे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन
सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
सन 2019-20 हे वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून हे वर्ष सामाजिक न्याय विभागामार्फत मोठ्या
उत्साहात विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 100 कोटी रूपयांचा
निधी उपलब्ध करून दिला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी
वर्षातील विविध कार्यक्रमांचा शुभारंभ त्यांच्या जन्मगावी वाळवा तालुक्यातील वाटेगाव
येथे त्यांना अभिवादन करून करण्यात आला. यावेळी बार्टी पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय
शाहिरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश
खाडे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सावित्रीमाई साठे यांचा विशेष सन्मान
करण्यात आला.
यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ
खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर
गाडगीळ, महापौर संगीता खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
अभिजीत राऊत, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती
ब्रम्हदेव पडळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई
साठे, प्रांताधिकारी नागेश पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,
जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, वाटेगावचे सरपंच सुरेश
साठे, मच्छिंद्र सकटे, विजयसिंह राजहंस यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत अण्णा भाऊ
साठे यांनी फार मोठे साहित्य निर्माण केले. त्यांचे साहित्य कष्टकरी, गोरगरीब, श्रमजीवी
समाजासाठी प्रबोधन करणारे ठरले असे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले,
अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव असणाऱ्या वाटेगावला मागासवर्गीय वस्ती विकासासाठी 1 कोटी
3 लाख रूपयांची तर स्मारकाच्या विकासासाठी 50 लाख रूपयांची शासनाने तरतूद केली आहे.
अण्णा भाऊ साठे यांचे राज्यात ज्या ज्या ठिकाणी पुतळे उभे आहेत त्या ठिकाणी त्यावर
मेटॅलिक डोम उभारण्यात येणार आहे. मातंग समाजातील गरजूंना येत्या वर्षभरात 25 हजार
घरे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अण्णा भाऊंचा जीवनपट लोकांसमोर मांडण्यासाठी
त्यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मातंग समाजातील उदयन्मुख
कलाकारांना वाद्य सामुग्रीचे वाटप करण्यात येणार आहे. शाहिर परिषदा, साहित्य संमेलने
यांचे आयोजनही करण्यात येणार असून लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या
विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अण्णा
भाऊ साठे टपाल तिकीटाचे प्रकाशनही आज मुंबई येथून करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी श्रमिकांचे
लढे उभारण्याचे काम अण्णा भाऊ साठे व त्यांच्या सहित्याने केले असे सांगून प्रतिकूल
परिस्थितीतून निर्माण झालेल्या या व्यक्तिमत्वाने कष्टकऱ्यांच्या चळवळीला बळ दिल्याचे
सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख
यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक
असल्याचे सांगितले.
आमदार शिवाजीराव नाईक यांनी संघर्षमय
जीवन जगणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून
मांडल्या. त्यांच्या जन्मगावी त्यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त
केली.
मिलींद शंभरकर यांनी प्रास्ताविक
केले. यामध्ये त्यांनी वर्षभर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यावेळी
त्यांनी शासन नेहमीच अनुसूचित जाती जमाती व मागासलेल्या सर्व जातीकरीता तसेच दुर्लक्षित
वंचित घटकांच्या विकासासाठी कायमच अग्रेसर राहिल्याचे सांगितले.
यावेळी रेहान नदाफ या बाल वक्त्याने अण्णा
भाऊ साठे यांच्याबद्दल विचार मांडले. ऋतुजा जाधव यांनी 65 किलो वजनी गटामध्ये कुस्तीत
राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब डांगे
माध्यमिक विद्यालय आष्टाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. शाहीर
आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला.
यावेळी आयोजित शाहिरी स्पर्धेत राज्यातील
विविध जिल्ह्यातून आलेल्या शाहिरांनी सहभाग
घेतला होता. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. प्रादेशिक उपायुक्त पुणे अविनाश
देवसटवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या
घराला भेट देवून पहाणी केली व अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत पुणे म्हाडाचे
अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Post a comment