राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी; पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अलिबाग
महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील. या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
No comments