कल्याण गांधारी पुलाला कसलेही तडे नाहीत;PWD कडून परीक्षण
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण
कल्याण येथील गांधारी पुल काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे बंद करण्यात आला होता. मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे परीक्षण केले. तपासणीअंती पुलाला कसलेही तडे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.गांधारी पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच हा पूल सोमवारी रात्री खबरदारी म्हणून तात्काळ बंद करण्यात आला. कल्याण शहरातून हा पूल पडघा भागाला जोडतो.
शिवाय नाशिकला जाण्यासाठी हा एक सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावरील गांधारी येथे उल्हास आणि काळू नदीच्या संगमी पात्रावर हा पूल उभा आहे. या पुलाची पुरामुळे दुरवस्था झाली असून पिलरला तडे गेले आहेत असा संशय प्रशासनाला आल्याने काल तात्काळ वाहतूक रोखली होती.मंगळवारी दुपारच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,स्थानिक रहिवासी आणि पत्रकारांसमवेत बोटीच्या माध्यमातून या पुलाची पाहणी करण्यात आली.
ज्या पिलरला तडे गेले आहेत त्या पिलरवर चढून अधिकारी तथापि इंजिनिअर यांनी पिलरची तपासणी केली. पुर परिस्थितीत पिलरला लपेटलेल्या काळ्या कपड्यामुळे सिमेंट उधडल्याचा आभास निर्माण होत होता. मात्र जवळून पाहणी केल्या नंतर पिलरला वेढलेले कापड आणि गवत बाजूला सारून व्यवस्थित परीक्षण करण्यात आले. यानंतर पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक दिलासादायक माहिती अधिकाऱ्यांनी ‘युवा महाराष्ट्र लाईव्ह’ न्यूजशी बोलताना दिली.
No comments