लोकमान्य टिळकांनी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
अनेक लोकांच्या त्याग, बलिदान व समर्पणातून देशाला स्वराज्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवून नवचेतना निर्माण करणारे लोकमान्य टिळक हे त्यापैकी प्रातःस्मरणीय नेते असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील लोकमान्य टिळकांच्या 165 व्या जयंतीनिमित्त ‘स्वराज्य पर्व’ या ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकवि रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास या संस्थेने केले होते. शिक्षक, पत्रकार, गीतेचे भाष्यकार व प्रखर राष्ट्रप्रेमी असलेले लोकमान्य टिळक दैवी प्रतिभावंत होते. मंडाले येथून तुरुंगवास संपवून परत आल्यावर सर्वस्व गमावले असून देखील ‘पुन:श्च हरिओम’ म्हणत त्यांनी नव्या उत्साहाने राष्ट्रकार्याला सुरुवात केली. शिवजयंती व गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याकरिता लोकांना एकत्र केले. स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करण्यासाठी युवकांनी लोकमान्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘स्वराज्य’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
No comments